तिसऱ्या दिवशीही भंडारदरा धरण अंधारात |
विजेअभावी विजेऱ्यांच्या मदतीने पहारा सुरू! राजूर, १८ मे/वार्ताहर एक लाख रूपये थकबाकीच्या कारणावरून तोडण्यात आलेली वीज आज तिसऱ्या दिवशीही पूर्ववत न केल्याने भंडारदरा धरण आजही अंधारात होते. थकित वीजबिल भरल्याशिवाय धरणाची वीज पूर्ववत केली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका वीज कंपनीने घेतल्याने या प्रश्नाचा तिढा कायम आहे. दरम्यान, वीज खंडित केल्याच्या पाश्र्वभूमीवर धरण परिसराची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरल्याने विजेअभावी आता विजेऱ्यांच्या प्रकाशझोतात धरणावर पहारा देण्याची वेळ पाटबंधारे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर आली आहे. अधिकाऱ्यांनी या संदर्भात आज धरणस्थळावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान, धरणाजवळील कर्मचारी वसाहतीचा वीजपुरवठाही आज खंडित करण्यात आला. बिल थकल्यामुळेच वसाहतीची वीज खंडित केल्याचे भंडारदरा येथील वीज कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अली यांनी सांगितले. भंडारदरा परिसरात पाटबंधारे विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता किरण देशमुख, शाखा अभियंता रामनाथ आरोटे आज उपस्थित होते. त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन विजेऱ्यांच्या साह्य़ाने धरण परिसरात गस्त घालण्यास सांगितले. तसेच वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून वीज जोडण्याची विनंती केली. मात्र, त्यास वीज कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आधी बिल भरा नंतरच वीज जोडली जाईल असेही त्यांनी या बाबत स्पष्ट केल्याचे समजते. वीज तोडण्याची ही तिसरी घटना असून वरिष्ठ पातळीवर या बाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेण्याची अपेक्षा पाटबंधारे अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना गोपनीय अहवाल पाठवून व्यक्त केल्याची माहिती कार्यकारी अभियंता ए. बी. चकोर यांनी दिली. |
No comments:
Post a Comment