पीरसाहेब उरूसाच्या गतवैभवाची राजूरकरांना ओढ |
राजूर, १८ मे/वार्ताहर एकेकाळी आठ दिवस चालणारा येथील पीरसाहेबांचा ऊरूस आता भरणेदेखील अशक्य झाले आहे. तो बंद पडण्याच्याच मार्गावर आहे. त्याचा विपरीत परिणाम राजूरच्या बाजारपेठेवर झाला आहे.अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात ११० आदिवासी गावे, वाडय़ा-वस्त्या आहेत. त्यातील ४० गावे मोठी आहेत. त्यांना डांगाणा म्हणतात. या डांगाणाची प्रमुख बाजारपेठ राजूर आहे. येथे दरवर्षी अक्षय्यतृतीयेनंतरच्या शनिवारी पीरसाहेबांचा ऊरूस भरतो. तो पुढे मंगळवापर्यंत म्हणजे चार दिवस चालत असे. परिसरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणूनही त्याचे महत्त्व आहे. गावातील दोन्ही समाजाचे लोक एकत्रितपणे संदल नाचवतात. त्याला आसपासची गावे व वाडय़ा-वस्त्यांमधून मोठी गर्दीही होई. उरूसाचे निमित्त साधून येथे जनावरांचा मोठा बाजारही भरत असे. त्यात गायीसारख्या दुभत्या जनावरांचाही समावेश होता. त्याबरोबरच बैल, कोंबडय़ाचीही मोठी खरेदी-विक्री होत असे. या चार दिवसांचीच असली, तरी त्याची तयारी व तत्सम कामांमुळे आठवडाभर गावात माठी वर्दळ असे. तमाशा, पारंपरिक मनोरंजनाचे कार्यक्रम असा उत्साह या काळात सळसळत होता. या उलाढालीमुळेच राजूरची बाजारपेठ गर्दीने फुलून जात होती. अलीकडच्या दोन-तीन वर्षांत मात्र यात्रा भरणेही मुश्कील झाले आहे. हा ऊरूसच आता रोडावला आहे. एकीकडे गावोगावच्या यात्रा वाढत असताना हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक ठरलेली ही यात्रा मात्र ओस पडू लागली आहे. गावोगावच्या यात्रा वाढविण्यासाठी ग्रामस्थ वैयक्तिक लक्ष देऊन विविध उपक्रम राबवतात. लोकवर्गणी करून मोठय़ा दिमाखात यात्रा पार पाडल्या जातात. राजूरच्या पीरसाहेबांच्या यात्रेचे वैभव मात्र लुप्त होते की काय, अशी चिंता आता व्यक्त होऊ लागली आहे. उरूसाच्या आधी येथेच काठय़ांची यात्रा भरते. त्याला अजूनही २५-३० हजार लोक हजेरी लावतात. मात्र, राजूरच्या यात्रेतील गर्दी वर्षांगणिक कमी होऊ लागली आहे. येथील ग्रामपंचायतीने त्याकडे लक्ष दिले पाहिजे असे यात्रेचे जुने वैभव पाहिलेल्यांना वाटते. यात्रेसाठी आवश्यक सोयी-सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यंदा बैलबाजार भरला. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्केही व्यवहार त्यात झाले नाहीत. नाराज होऊनच बाहेरची मंडळी येथून परतली. हा ऊरूस व यात्रेवर अवलंबून असणारी अर्थव्यवस्था, तसेच गावची परंपरा टिकवण्यासाठी ग्रामपंचायतीने वेळीच पावले उचलावी, निदान पुढच्या वर्षी तरी या कमतरता राहू नये, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे |
No comments:
Post a Comment