Thursday, May 19, 2011


थकबाकी भरूनही भंडारदरा धरण अंधारात!Bookmark and SharePrintE-mail
राजूर, १९ मे/वार्ताहर
भंडारदरा धरणाची वीज आज चौथ्या दिवशी पाटबंधारे खात्याने नगर येथे १ लाख १ हजार रूपये थकबाकीचा भरणा करूनही रात्रीपर्यंत पूर्ववत सुरू केली नव्हती. त्यामुळे थकबाकी भरूनही धरण अंधारात असल्याची स्थिती तयार झाली. थकित बिल भरूनही वीज कंपनी या बाबत पुरेशा गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र स्पष्ट झाले.
या संदर्भात वरिष्ठांकडे गोपनीय अहवाल पाठविण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांचेही लक्ष वेधले आहे. भंडारदरा विभागाचे सहायक अभियंता किरण देशमुख यांनी आज दुपारीच १ लाख १ हजार रूपयांचा धनादेश वीज कंपनीकडे पाठविल्याचे सांगितले. नगर येथे या रकमेचा धनादेश देण्यात आला. उत्तर नगर जिल्ह्य़ाची जीवनदायिनी ठरलेल्या या धरणाची वीज थकबाकीच्या कारणामुळे गेले चार दिवस बंद आहे. तांत्रिक कारणामुळे थकित वीजबिल वेळेवर न भरल्याने वीज कंपनीने नियमाची अंमलबजावणी करीत धरणाची वीज खंडित केली. वीज खंडित करण्यात वीज कंपनीने तत्परता दाखविली. परंतु धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र यामुळे ऐरणीवर आला. आतापर्यंत तीन वेळा थकबाकीच्या कारणावरून धरणाची वीज खंडित करण्यात आली, यास सरकारी यंत्रणेचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे. धरणाच्या सुरक्षिततेसाठी गुप्तचर विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र, विजेविना तेही चालू शकमार नसतील, तर मग धरणाच्या सुरक्षिततेचे काय, हा खरा प्रश्न आहे. वीज खंडित करण्यात दाखविली तीच तत्परता थकबाकी भरल्यानंतर का दाखविली गेली नाही, असा प्रश्न रात्री धरणावरून विचारला जात होता. वीज कंपनीला या बाबत जाब विचारण्याची गरजही व्यक्त होत आहे.     

1 comment: