Tuesday, May 17, 2011

आर्थिकदृष्टय़ा सधन बनलेल्या श्रीगोंदेकरांसाठी लग्न समारंभात संपत्तीचे प्रदर्शन करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यातच ‘गुंठा मंत्री’ बनलेल्या पुणेकरांचा नवरदेव जर थेट हेलिकॉप्टरने आला तर मग पैसा असणाऱ्यांचे पित्त खवळणारच. यावर्षी लग्नात कोटय़वधींचा चुराडा होत आहे. एकीकडे नुसता नवरदेव व त्याच्यासोबतच्या करवल्या नेण्या-आणण्यासाठी दोन हेलिकॉप्टरला सात लाखांची बिदागी देण्यात आली. दुसरीकडे घरी लक्ष्मी नांदत असतानाही सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद संभाळणाऱ्या जबाबदार नेत्याने मुलाचे लग्न सगळी हौसमौस बाजूला ठेवून अत्यंत साध्या पध्दतीने करून वेगळा पायंडा पाडला!
लग्न म्हणजे रेशमी बंधनाची गाठ समजली जाते. पूर्वी लग्न समारंभ जास्त दिवस चालायचा, मात्र खर्च कमी होई. पण गेल्या काही वर्षांत कमालीचा बदल झाला. लोकांकडे भरमसाठ पैसा आल्याने लग्नातील पध्दती बदलल्यात. मंडपाची जागा मंगल कार्यालयाने घेतली. जेवणाचे पदार्थ आता पंचपक्वानापर्यंत मर्यादित न राहता सधन व्यक्ती सहज आठ दहा पदार्थ करतात. मिनरल वॉटर ही तर कॉमन बाब झाली आहे.
एका किंवा साध्या बॅन्ड बाजावर हौस होत नसल्याने आता डीजे लागतोच. लग्नात पुढाऱ्यांसाठी हार-तुरे, फेटा हे आलेच. पूर्वी नवरदेव बैलगाडीने लग्नस्थळी जात होता. नंतर घोडय़ाने व जीपगाडी नवरदेवाचे वाहन झाले. पण आता येथील सांगवीदुमाला या गावात झालेल्या एका लग्नाने सगळे उच्चांक मोडले.
पुणे जिल्ह्य़ातील शिक्रापूर येथील नवरदेव घोडा गाडीने नव्हे, तर चक्क हेलिकॉप्टरमध्ये विवाहस्थळी आला, तेही दोन हेलिकॉप्टर घेऊन! नवरीमुलगी तालुक्यातील पेडगाव येथील एका सर्वसाधारण कुटुंबातील आहे. या दोन हेलिकॉप्टरला नवऱ्यामुलाने सात लाख रूपये मोजल्याची चर्चा आहे. लग्नात पुणेकर पैसा उडविण्यात मागे पुढे पाहत नाहीत असा ग्रामीण भागातील श्रीमंतांचा गैरसमज झाल्याने येथेही लग्नात पैसा खर्च करण्याची ओंगळवाणी स्पर्धाच लागली आहे. गेल्या काही वषार्ंपासून उसासह इतर शेतमालातून भरभक्कम पैसा मिळाला. शिवाय इतर मार्गाने पैसा कमविणाऱ्यांची संख्याही चांगलीच आहे. आर्थिक परिस्थिती चांगलीच वधारल्याने दोन्ही हाताने संपत्ती उधळण्याला तथाकथित प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
ज्या दिवशी सांगवीत हेलिकॉप्टरच्या साक्षीने लग्न झाले त्याच दिवशी, पण या सगळया अनावश्यक खर्चाला फाटा देऊन मर्यादित आप्तेष्टांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घन:शाम शेलार यांच्या मुलाचे लग्न झाले. त्यांचा मुलगा प्रवीण आणि रूईगव्हाण (कर्जत) येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रेय पवार यांची कन्या मेघना साध्या पध्दतीने विवाहबध्द झाले. केवळ सावलीसाठी मंडप व साधे जेवण या दोनच गोष्टी या लग्नात होत्या. ना बँडबाजा-ना बारात, शिवाय पुढाऱ्यांना निमंत्रणच नव्हते. त्यामुळे लग्न वेळेवर लागले. विशेष म्हणजे अक्षदारूपी तांदूळही मोजून सात जोडप्यांच्या हातात होता. त्यामुळे हा तांदूळ जमिनीवर सांडून वाया गेला नाही. या सगळया गोष्टी शेलार व पवार कुटुंबांनी पाळल्या त्या पैसे नव्हते म्हणून नव्हे, तर परिवर्तनाची कुणीतरी सुरूवात करायची म्हणून. कारण आता पैसा व वेळ वाया घालणे म्हणजे थाटामाटात लग्न करणे हाच गैरसमज दृढ झाला आहे. त्याला कृतीतून   फाटा देण्याचे काम या दोन कुटुंबांनी केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘अगोदर समाजकारण मग राजकारण’ या आदेशाचे पालन करण्याचा हा छोटा प्रयत्न होता, असे शेलार म्हणाले. मुलांचे कौतुक करण्यासाठी दोन्हीकडेही सर्व काही असताना समाजाला ज्याची आज खरी गरज आहे ते करण्यात मुलांनी संमती दिल्याने हे सहज शक्य झाले. लग्नातील अनावश्यक खर्च कमी करून त्या पैशाचा विनियोग योग्य ठिकाणी करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.    

काही वर्षांपूर्वी श्रीगोंदे कारखाना येथील आदिवासी समाजातील दारिद्र्यरेषेखालील एका कुटुंबाने हत्तीवरून वराची मिरवणूक काढून शाही विवाह केला होता. साठवलेला पैसा असा का खर्च करता या प्रश्नाला त्या कुटुंबाने पैसेवालेच असे लग्न करू शकतात काय हे दाखवून द्यायचे होते म्हणून हा खर्च केला असे उत्तर दिले होते. त्यामुळे आता पैशाचे ओंगळवाणे प्रदर्शन करण्याऐवजी साध्या पध्दतीने विवाह लावून कुठेतरी सामाजिक बांधिलकीची सुरूवात स्वत:पासून करण्याचा प्रयत्न होऊ लागलायं, ही पण जमेची बाजू आहे.

No comments:

Post a Comment