लग्न समारंभातही ‘भीमशक्ती-शिवशक्ती’ युती |
राजूर, १७ मे/वार्ताहर राजकारण गल्लीतील असो नाहीतर दिल्लीतील, त्याचे पडसाद समाजात तातडीने उमटतात. राज्यात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार ही गोष्ट निश्चित होताच लग्नसमारंभातही त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. येथील एका लग्न समारंभात चक्क भगवे आणि निळे फेटे पाहुण्यांना बांधून वधू व वराकडील मंडळींनी नव्या राजकीय समीकरणाला प्रतिसाद दिला. दोन दिवसांपूर्वी लग्नाची मोठी तीथ होती. येथील विजय पवार यांची कन्या आणि अनंतराव पराड यांचा मुलगा अशा विवाह सोहळ्यात यजमानांनी पाहुण्यांचे स्वागत जाणीवपूर्वक निळ्या व भगव्या फेटय़ांनी केले. लग्नाला दोन्हीकडची पाहुणे मंडळी मोठय़ा संख्येने उपस्थित होती. दोन्ही काँग्रेस, भारिप, शिवसेना, भाजप अशा विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा त्यात समावेश होता. मात्र, वधू व वराकडील मंडळी प्रामुख्याने भाजप-शिवसेना युती व भारिपला मानणारी होती. त्याचे प्रतिबिंब या स्वागताच्या फेटय़ांमध्ये उमटले. राज्यातील नव्या राजकीय समीकरणाच्या पाश्र्वभूमीवर शिवशक्ती-भीमशक्ती एकत्रीकरणाचे स्वागत करीत त्याच रंगाचे फेटे बांधण्याचे औचित्य या मंडळींनी दाखवले. पूर्ण लग्न समारंभात त्याचीच चर्चा सुरू होती. निळे व भगवे फेटेही उठून दिसत होते. विशेष म्हणजे पाहुण्यांनी तळपत्या उन्हातही लग्नसमारंभ संपेपर्यंत हे फेटे डोईवर ठेवून एकप्रकारे भीमशक्ती-शिवशक्तीला पाठिंबाच दिला. |
No comments:
Post a Comment