भंडारदरा धरण दुसऱ्या दिवशीही अंधारात! |
राजूर, १७ मे/वार्ताहर भंडारदरा धरणाची थकबाकीमुळे खंडित केलेली वीज आज दुसऱ्या दिवशीही पूर्ववत न केल्याने धरण अंधारातच आहे. वीजबिल भरल्याशिवाय वीज पूर्ववत देता येणार नाही, असे वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता चाफेकरंडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, धरणाची वीज तोडण्याआधीच या बाबत तसे बोलायला हवे होते, असे चाफेकरंडे यांनी म्हटले, तर पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता ए. बी. चकोर यांनी यांनी आम्ही अधीक्षक अभियंता यांना विनंती केली. त्यांनी मुख्य अभियंता यांच्याशी बोलावे लागेल असे सांगून फोन बंद केला, याकडे लक्ष वेधले. परंतु अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीत धरणाची वीज सलग दुसऱ्या दिवशी बंदच राहिली. धरणाच्या पाण्यावर मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती होते. उत्तर नगर जिल्ह्य़ास सुजलाम सुफलाम करणाऱ्या या धरणाची वीज केवळ एक लाख रूपये बिल थकल्यामुळे काल खंडित करण्यात आली. धरणाची वीज तोडण्याची ही तिसरी वेळ आहे. सरकारकडून अनुदान प्राप्त न झाल्याने वीजबिल भरता आले नाही. परंतु आम्ही अधीक्षक अभियंता चाफेकरंडे यांना या बाबत विनंती केली होती. त्यांनी मुख्य अभियंता यांच्याशी बोलावे, असे सांगितले. मात्र, विनंती मान्य न करता वीज खंडित केली. या बाबत गोपनीय अहवाल वीज कंपनीचे सचिव, मुख्य अभियंता, पाटबंधारे विभागाचे सचिव, मुख्य अभियंता यांना पाठविण्यात आला आहे. धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गुप्तवार्ता विभागाकडून गोपनीय अहवाल आल्यामुळेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यासाठी वीजपुरवठा आवश्यक असताना विनंती करूनही अधीक्षक अभियंत्यांनी ती मान्य न केल्याचे चकोर यांनी सांगितले. पाटबंधारेचे ५ लाख वीज कंपनीकडे थकित असूनही या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, या साठी आपण तातडीने वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सहायक अभियंता किरण देशमुख यांनीही थकबाकीबाबत वीज कंपनीला नोटीस पाठविणार असल्याचे स्पष्ट केले. चाफेकरंडे यांनी मात्र धरणाची वीज तोडण्यापूर्वी आम्ही पाटबंधारे विभागाला नोटीस दिली होती, असे सांगून वीज तोडल्यानंतर ती पूर्ववत करणे माझ्या हातात नाही. वरिष्ठांचा आदेश येईपर्यंत वाट पाहावी लागते, असे स्पष्ट केले. वीज तोडल्यानंतर पाटबंधारे खात्याने दूरध्वनी केल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उद्या वीजबिल भरल्यानंतर वीज जोडून देऊ, असेही ते म्हणाले. ‘त्या’ बिलावरून टोलवाटोलवी! पाटबंधारे खात्याचे आमच्याकडे कोणतेच बिल पेंडिंग नाही. तशा प्रकारचे आमच्याकडे पत्रही नाही. मात्र, वीज खंडित केल्यावर त्यांना आमच्याकडे बाकी असल्याचे आठवते, असे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या मुद्यावरून पाटबंधारे व वीज कंपनी यांच्यात ‘टोलवाटोलवी’ सुरू असून धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर तातडीने बैठक होणे अपरिहार्य ठरले आहे. |
No comments:
Post a Comment