Thursday, June 30, 2011



राजूरला १६ हजार रोपांची लागवड
राजूर - राजूर ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता ठेऊन सर्वागीण आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आश्वासन नियोजित सरपंच हेमलताताई पिचड यांनी दिले. या वाटचालीत काही कठोर निर्णयही घ्यावे लागतील. त्यासाठी सर्वाच्या सहकार्याची गरज आहे असे त्या म्हणाल्या. पर्यावरण संतुलीत ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत १६ हजार रोपे लावण्याचा प्रारंभ युवक नेते वैभव पिचड यांच्या हस्ते कोल्हार-घोटी रस्त्यावर झाला. पहिल्या टप्प्यात ३ हजार झाडे लावण्यात आली. त्यावेळी श्रीमती पिचड बोलत होत्या. ग्रामपंचायतीची निवडणूक त्याच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीच्या इतिहासात ७६ वर्षांत प्रथमच निवडणूक बिनविरोध झाली, त्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. प्राचार्य टी. एन. कानवडे, सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांची या वेळी भाषणे झाली. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तानाजी पावडे, वन विभागाचे संगमोर, कृषी विभागाचे नाईक, तसेच शशिकांत देशमुख, गणपत देशमुख, पत्रकार शांताराम काळे आदी उपस्थित होते. 

Saturday, June 25, 2011

लक्ष लक्ष काजवे...नभोमंडळातील तारकादळेच जणू धरतीच्या भेटीला आले आहे...! आपल्या चहुबाजूला पसरलेल्या मिट्ट काळोखाच्या साम्राज्यात 'अग्निशिखा' हे विशेषण सार्थपणाने मिरविणा-या काजव्यांचा लयबद्ध चमचमाट सुरु आहे... आपण निशब्द...कल्पना करा... काय अदभूत देखावा दिसत असेल ना हा..!

Print
अकोले, २५ जून/वार्ताहर
निळवंडे धरणाचे कालवे अकोले तालुक्यापुरते बारमाही असतील. उपसा सिंचनाद्वारे किंवा पाटाद्वारे पाणी घेणे हे दोन्ही पर्याय तालुक्यातील शेतक ऱ्यांना उपलब्ध असतील. तसेच केवळ अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय कालवे बंद पाईपचे असतील. त्यास २०० कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती आमदार मधुकर पिचड यांनी दिली.
नव्यानेच बदलून आलेले जलसंपदाचे अधीक्षक अभियंता वा. ल. साबळे यांनी येथील विश्रामगृहावर पिचड यांची भेट घेतली. निळवंडे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे व जी. बी. नाबर हेही त्यांच्याबरोबर होते. चर्चेनंतर पिचड पत्रकारांशी बोलत होते. अकोले तालुक्यातील कालव्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून २-३ दिवसांत ते पूर्ण होईल. हे कालवे बंद पाईपचे असतील. त्यातून पाझर तलाव, तसेच बंधाऱ्यात पाणी सोडण्याचे नियोजन आहे, असे त्यांनी सांगितले.
निळवंडे प्रकल्पाचे मुख्य कालवे ६१० मीटर तलांकावरूनच निघतील. हे कालवे विनाअस्तराचे असतील. तसेच त्यामध्ये ठरावीक अंतरावर झडपा बसवण्यात येणार आहेत. या कालव्यांतून अकोले तालुक्याला बारमाही पाणी मिळेल, असे पिचड यांनी स्पष्ट केले.
प्रवरा खोऱ्यात सध्या उपसा सिंचनाद्वारे भंडारदऱ्याचे पाणी शेतीला दिले जाते. आपल्या शेतीला उपसा सिंचन की पाटाने पाणी द्यायचे याचा निर्णय संबंधित शेतक ऱ्यांवर अवलंबून आहे, असे पिचड म्हणाले. निळवंडे जलाशयातून ४४ कोटी खर्चाच्या ३ उपसा सिंचन योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे दिवाळीपर्यंत पूर्ण होतील. लवकरच माळेगाव-कातळापूर या चौथ्या योजनेचे काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यात पाण्यासंदर्भातील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही पिचड म्हणाले. या वेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, वैभव पिचड, मिनानाथ पांडे, परबत नाईकवाडी, काँग्रेसचे अशोक भांगरे आदी उपस्थित होते.
सह्य़ाद्रीतील सर्वात खडतर डोंगरयात्रा कोणती असा सवाल जर खडा झाला तर उत्तर ठरलेलं आहे.. कळसूबाई रांग. महाराष्ट्राच्या या शिखरसम्राज्ञीच्या सानिध्यात वसलेले तीन सर्वागसुंदर गिरिदुर्ग म्हणजे अलंग-मदन व कुलंग. अभेद्यपणा तर या तिघांचा आधारस्तंभ आणि ट्रेकर्सच्या जिव्हाळ्याचा विषय. यातल्या अलंग आणि मदनचे अनेकजण निस्सीम भक्त आहेत. कातळारोहणाशिवाय अलंग आणि मदनचा माथा गाठणं खरोखरंच कठीण. त्यामुळे साहस ज्यांच्या नसानसात भिनले आहे अशांसाठी या दोन्ही किल्ल्यांची चढाई म्हणजे आभाळाला हात टेकल्यासमानच आहे. पण यातला तिसरा दुर्ग मात्र तुलनेने सोप्या चढाईमुळे गिर्यारोहकांच्या दुर्लक्षितपणाचा शिकार झाला आहे. ‘सह्य़ाद्रीतील सर्वोच्च चढाई’ असा नावलौकिक प्राप्त झालेला याच दुर्गमालिकेतील शेवटचा दुर्ग म्हणजे ‘कुलंगगड.’ बऱ्याचदा ‘पुन्हा केव्हातरी करू’ अशा क्षुल्लक कारणामुळे अनेकजण या स्वर्गसुखाला मुकतात, पण कुलंगच्या दर्शनाशिवाय मात्र ही दुर्गयात्रा अपूर्ण आहे.
आता या किल्ल्याला जायचे मार्ग अनेक, पण सोईचे मार्ग साधारणपणे दोन. नगर जिल्ह्य़ातील संगमनेरपासून  प्रवास सुरू करावा आणि संपवावा तो थेट पायथ्याच्या आंबेवाडीत. राजूर-भंडारदरा मार्गे दोन तासांच्या प्रवासानंतर आंबेवाडीची घरकुले आपल्याला दिसायला लागतात. दुसरा मार्ग म्हणजे राजूर-भंडारदरा शेंडीमार्गे पायथ्याचं घाटघर गाव गाठायचं (नाणेघाटाजवळील घाटघर वेगळं असून ते पुणे जिल्ह्य़ात आहे.) घाटघरचा कोकणकडा म्हणजे भीषणपणाचा इरसाल नमुना. घाटघरहून कुलंगला जायचा मार्ग म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. पुन्हा चढणही सोपी आहे. पण वाटाडय़ा मात्र हवा. ही वाट नगर व ठाणे जिल्ह्य़ांच्या सीमारेषेला चिकटून जात असल्याने कोकणातील डोंगररांगांचं देखणेपण अनुभवावं ते इथूनच. तिसरा मार्ग हा मदन आणि कुलंगच्या खिंडीतून कुलंगवर येतो. पण ज्यांना नुसता कुलंग करायचा आहे त्यांनी आपलं वरच्या दोन वाटांपैकी हवं तिथून यावं. कुठुनही जा. चार- पाच तासांची मनसोक्त पायपीट संयमाचा अंत पाहात असली तरी सुखावणारी आहे. या तीनही वाटांचा संगम होतो तो एका झाडापाशी. कुलंगची दिशादर्शक पाटी भटक्यांचे स्वागत करायला या झाडावर ठाण मांडून आहे. आता इथून सुरुवात होते ते कुलंगच्या खडय़ा चढणीला. मुरमाड लाल मातीचा कारवीने वेढलेला मार्ग आपले पाय ओढत राहतो, पण आपण लक्ष नाही द्यायचं. पंधरा-वीस मिनिटांनंतर ही चढण संपते ती पायऱ्यांच्या लांबलचक वाटेपाशी. मान उंच करून कुलंगच्या कातळकडय़ाकडे पाहात या पायऱ्यांचा मागोवा घेतला की कळतं या आपल्याला कुलंगच्या माथ्यापर्यंत साथ देणार आहेत. आपण त्यांच्यावर स्वार होऊन आपला मार्ग आक्रमत राहिलो की त्यांचा वाढत जाणारा अंश काही ठिकाणी मात्र धडकी भरवतो. डावीकडे खोल दरी आणि उजवीकडे अंगावर येणारा कातळ यांच्या कचाटय़ात आपण सापडतो. पण सह्य़ाद्रीतील सर्वोच्च चढाई असणाऱ्या या किल्ल्याला मात्र सगळं माफ आहे. या अरुंद वाटेवर उजवीकडे एक छोटी गुहादेखील आहे. पूर्वी इथे दरवाजा असावा असे अनुमान काढता येते. आपले धापावलेले ऊर इथं शांत करायचे आणि गुहेतून चौकटीतून सहज बाहेर नजर टाकायची. मदनगडाचा आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या कळसूबाई शिखराचा नजारा मात्र सारा शिणवटा घालवणारा आहे. आता सुरू होतो तो शेवटचा खडा चढ. सुमारे शंभर उभ्या पायऱ्या चढल्या की उजवीकडे कुलंगच्या भग्न दरवाजाचे दोन बुरुज दिसतात. इथे कुलंगची चढाई संपते. पण ‘सब्र का फल मिठा होता है’ या उक्तीचा प्रत्यय यायला सुरुवात झालेली असते. दरवाजातून आत पाऊल ठेवल्यावर डावीकडे व उजवीकडे पसरत गेलेलं कुलंगचं विस्तीर्ण पठार आहे. आधी कुठं जायचं हा प्रश्न साहजिक आहे. पण पाठीवरच्या भरलेल्या सॅकने व त्यात कुलंगच्या कठीण चढाईने हाडं खिळखिळी केलेली असल्याने आपण आधी उजवीकडे जाऊ. उजवीकडे कुलंगच्या प्रशस्त अशा मुक्कामायोग्य गुहा आहेत. पाठीवरचं जड झालेलं ओझं इथं उतरवलं की कसं बरं वाटतं. कुलंग किल्ला साधारणपणे पूर्व पश्चिम पसरला आहे. किल्ल्यावर येईपर्यंत दुपार होते. कुलंगच्या पश्चिम टोकावरून दिसणारा सूर्यास्त बघायचा असेल तर आधी पूर्वेकडची बाजू फिरायला बाहेर पडायचं आणि नंतर पश्चिमेकडील अवशेष पाहात सूर्यास्ताचा आनंद लुटायचा.
गुहा डावीकडे ठेवून पुढे गेलं की लागतो कुलंगवरील सुंदर असा नऊ टाक्यांचा समूह. खडकात खोदलेली ही टाकी हीच तर कुलंगची खासियत आहे. कोणत्याही टाक्यातलं पाणी प्या. थंडगारपणा आणि सह्य़ाद्रीतल्या पाणवठय़ाची विशेष चव सगळीकडे सारखीच आहे. या टाक्यांच्या साधारण मध्यावर खडकातच कोरलेले गणपतीचे शिल्प आहे. या टाक्यांपासून सरळ चालत सुटलो की पाण्याची आणखी काही खोदीव टाकी दिसतात, पण या टाक्यांचे वैशिष्टय़ म्हणजे या टाक्यांमधील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवण्यासाठी दगडांचा बांध घातलेला आहे. किल्ल्यावर पाण्याचे जिवंत झरे नसल्याने साठवलेल्या पाण्यावरच गडावरील सैन्याला गुजराण करावी लागत आहे. त्यामुळे गडावर जास्तीत जास्त पाणसाठा राहावा यासाठी ही सोय. कुलंगच्या या बाजूला एवढेच अवशेष आहेत. पण इथून घडणारे अलंग, मदन, कळसूबाई, रतनगड, भंडारदरा जलाशय, आजोबा डोंगर, पाबरगड यांचे दृष्य मात्र स्फूर्तिदायक आहे. इथे दोन घटका आराम करायचा आणि पिछे मूड करून गडाच्या पश्चिम टोकाकडे निघायचं. आपल्या मुक्कामाच्या गुहांच्या पुढे जाणारी पायवाट धरून पुढे चालत राहिलं की गडावरील खऱ्या अवशेषांना सुरुवात होते. सुरुवातीला पाण्याची भलीमोठी टाकी आहेत. गुहांच्या अगदी जवळ असल्याने या पाण्याचा वापर निर्धोकपणे करता येतो. पुढे गडाचे भग्नावशेष दिसायला लागतात. कुलंगवरचे दोन वाडे जरी पडलेले असले तरी त्यांच्या दोन बाजूंच्या भिंती मात्र अजूनही मजबूत आहेत. पुढे काही इमारतींचे पूर्णपणे ढासळलेले अवशेष आहेत. या अवशेषांची संख्या बघता कुलंगवर पूर्वी बऱ्यापैकी राबता असणार याची खात्री पटते. कुलंगच्या पश्चिम टोकावरून ठाणे जिल्ह्य़ातील डोंगर बघितले की नजरेचं पारणं फिटतं. वातावरण स्वच्छ असेल तर माहुलीचा किल्लाही दिसू शकतो. इथून दिसणाऱ्या सूर्यास्ताच्या दृश्याला मात्र तोड नाही. घाटमाथ्यावरील शेवटचे ठिकाण असल्याने हा नजारा एकमेवाद्वितीय आहे. तो डोळ्यात साठवून घ्यायचा आणि गडफेरीचा समारोप करायचा.
कुलंग किल्ला व्यवस्थित पाहायचा असेल तर किमान दोन तास हाताशी हवेत. आता मागं फिरून दिवसभर झालेली तंगडतोड घालवण्यासाठी गुहांमध्ये पथाऱ्या पसरल्या की दिवसभराचा सगळा भ्रमंतीपट डोळ्यांसमोरून सरकायला लागतो. कुलंगवरच्या या प्रशस्त गुहांमधला मुक्काम हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. किल्ल्याचं भौगोलिक स्थान, पाण्याची टाकी, अवशेष, मुक्कामाची उत्कृष्ट सोय आणि अर्थातच वरून दिसणारे खास दृष्य या सर्व वैशिष्टय़ांनी कुलंगला समृद्ध केले आहे. दैनंदिन आयुष्याच्या चौकटीतून बाहेर पडून दोन दिवस सुखात घालवायचे असतील तर कुलंगला पर्याय नाही. थोडक्यात काय तर कुलंग हा सर्वार्थाने भटकंतीचे परिपूर्ण ‘पॅकेज’ आहे. ते अनुभवायचं असेल तर वाट वाकडी केलीच पाहिजे.

Monday, June 20, 2011






















संक्षिप्त : भंडारदरा धरणात तरूणीचा गूढ मृत्यूBookmark and SharePrintE-mail
पंधरवडय़ातील तिसरी घटना
राजूर, २० जून/वार्ताहर

भंडारदरा जलाशयात आज सकाळी स्थापत्य अभियंता रेश्मा कैलास भारती (वय २६) हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. भंडारदरा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू होण्याची गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
संगमनेरला खासगी ठिकाणी सेवेत असणारी रेश्मा भारती घरातून रुसून बाहेर गेली. तिच्या घरच्यांनी या बाबत संगमनेरला बेपत्ता असल्याची नोंद केल्याचे समजते. आज सकाळी तिचा मृतदेह धरणाच्या वीजनिर्मिती विहिरीजवळ आढळला. तिचे वडील कैलास भारती हे घाटघरला पाटबंधारे विभागाच्या सेवेत असून, पाण्यावर तरंगणारा मृतदेह रेश्माचाच असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक रहिवाशांनी तिच्या घरच्यांशी संपर्क साधला. मयताचा भाऊ राहुल कैलास भारती (वय २९) याने घटनास्थळी येऊन मृतदेह आपल्या बहिणीचाच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर स्थानिक कर्मचारी बाजीराव बंदसोडे व पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी मृतदेहाच्या गळ्याभोवती काळसर डाग, जीभ बाहेर आलेली दिसून आले. या संदर्भात पोलीस कसून तपास करीत आहेत. हा घातपाताचा संशय असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रेश्माच्या पायात बूट, अंगावर सलवार कुर्ता होता. राजूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.      

Saturday, June 18, 2011















कोणत्याही वस्तूची खरेदी करताना तशी जाणीवपूर्वकच करायला हवी. अन्यथा ती वस्तू खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप करण्यात अर्थ नसतो. भाजी खरेदी करतानाही तिची किंमत किती, नावडती भाजी की आवडती भाजी, टिकेल की नाही, मला भाजीवाला फसवत तर नाही ना, असे एक ना दोन अनेक प्रश्न मनात येतात. अगदी मग भाव करण्यापर्यंत मजल जाते. भाव केल्याशिवाय मनाला स्वस्थताही मिळत नाही, अशी माणसेही कमी नाहीत. असो. सांगण्याचा मथितार्थ इतकाच की खरेदी करताना पैसे खिशात आहेत, ते खर्च करायचे आहेत म्हणून मोटार खरेदी करतो असे कोणी म्हणत नाही. लाखाची गोष्ट चित्रपटात नायकाला त्याच्या प्रेयसीच्या वडिलांनी एक लाख रुपये खर्च करण्यास दिले. ते खर्च करण्यासाठी मागेपुढे न कुचरता त्याने पाहिजे तसे ते खर्च केले, पण पैसे कमी झाले नाहीत. उलट वाढले. अर्थात अशी स्थिती सर्वानाच लाभते असे नाही! ती योग्यही नाही. पैशाची, वेळेची किंमत जाणायला हवी. वस्तूची गरज, उपयुक्तता ओळखायला हवी तरच खर्च केलेले पैसे कारणी लावले असे म्हणता येते.
मला मोटार घ्यायची आहे. कोणती घ्यावी? असा प्रश्न पहिल्यांदाच मोटारीची खरेदी करणाऱ्याला पडतो. तुमचे उत्पन्न चांगले आहे. मोटार घेणे आर्थिकदृष्टय़ा मला परवडते म्हणून मोटार घेऊ शकतो. पण इतकेच पुरेसे नाही. मुळात मोटार कशासाठी हवी आहे? तुम्ही ती कुठे वापरणार आहात. मुंबई-पुण्यासारख्या गर्दीच्या व वाहतुकीची कोंडी होणाऱ्या शहरात नेहमी वापरणार आहात का शहराबाहेर जायला वापरणार आहात हे स्पष्ट ठरवायला हवे. त्यानंतर तुमची गरज किती आहे. किती वेळा मोटारीचा वापर करणार आहात. शहराबाहेरच्या प्रवासासाठी शोफर ठेवणार की स्वत: तुम्ही मोटार चालविणार आहात. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत त्यामुळे तुमच्या कपाळाला आठय़ा पडणार आहेत का, तसे असेल तर मोटार खरेदी केवळ पैसे आहेत म्हणून करू नये. याचे कारण मोटार ही मुळात तशी चैनीचे वा आरामदायी साधन आहे. तो आराम तुम्हाला मिळत असेल तर मोटारीसाठी खर्च करणे मनाला पटेल. अन्यथा ती मोटार घेऊन तुम्हाला आनंदापेक्षा दु:ख होणार असेल, चिंता वाटणार असेल, कपाळाला आठय़ा पडणार असतील तर मोटार खरेदी करू नये, असेच स्पष्ट मत मांडावे लागेल. वाढत्या महागाईचा आलेख इतिहासातही वाढत असलेला दिसतो म्हणून कोणी चैनी थांबविल्या नाहीत त्या करत आहेत. फक्त आपण मोटार ही अनाठायी वापरण्याचे साधन करू नये. तर ती तुमच्या जीवनशैलीची गरज वाटत असेल तर परवडणारी वस्तू म्हणून स्वीकारायला नक्कीच हरकत नाही. त्याचप्रमाणे त्याने ते मॉडेल घेतले म्हणून मी मोटारीचे त्यापेक्षा अधिक झकास मॉडेल घेणार, या स्पर्धेतही उतरू नये.
वास्तविक मोटार म्हणा वा दुचाकी म्हणा ही वाहने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची साधने आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे. भारतासारख्या विकसनशील देशाला आजही मोटार ही चैन आहे. पेट्रोलपेक्षा स्वस्त असणाऱ्या डिझेलचा पर्याय निवडला तरी अजूनही पेट्रोल इंजिनापेक्षा डिझेल इंजिनावरील मोटारीवर अधिक देखभाल खर्च करावा लागतो ही मानसिकता बदललेली नाही. एलपीजी वा सीएनजी या इंधनांवर चालणाऱ्या मोटारी या इंजिनाला फायदेशीर आहेत, असेही म्हणता येत नाही.  वाढती वाहतूक आणि त्यामुळे होणारी रस्त्यावरील मोटारींची-वाहनांची कोंडी ही शहरातील समस्या तर गावांमध्ये अजूही अनेक ठिकाणी नीट रस्ते नाहीत, सेवाकेंद्रे वा दुरुस्तीची नीट सोय नाही किंवा सुटेभाग मिळत नाहीत ही समस्या लक्षात घेतली पाहिजे. या स्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसेच उत्पन्नाचा व त्यानुसार मोटार घेणे कसे परवडेल याचा विचार केल्यानंतर मोटार हॅचबॅक, एसयूव्ही की सेदान घ्यावी हे तुम्ही मोटार किती व कुठे वापरणार यावर व वाहतुकीसंबंधातील स्थितीवर गांभीर्याने विचार करून मगच निर्णय घेणे उत्तम होईल. अनेकदा शहरात मोटार वापरायची असेल तर हॅचबॅक चालविणे सोयीस्कर. त्या मोटारी लांबीला कमी त्यामुळे पार्किंगसाठी उपयुक्त ठरतात. तर इंधनही कमी लागते. सामानही ठेवण्यासाठी जागा बऱ्यापैकी असते. इतकेच नव्हे तर सेदानमधील आरामदायी आसनव्यवस्थेसारखी आसने या मोटारीमध्येही मिळतात. सेदान मोटारीच्या मालकीतून कदाचित एक पॉश व उच्चभ्रू असल्याचा भास होत असला, प्रेस्टिज वाटत असले तरी भारतीय शहरातील रस्ते युरोपमध्ये असतात तसे मोठे नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ती चालविणे तसे शहरी वाहतुकीत कटकटीचे वाटते. शोफर असेल तर उत्तम तरीही वाहतूक कोंडीला तोंड देताना मोटारीत बसून आराम मिळतो की नाही ते प्रत्येकाने ठरवायचे आहे.
गेल्या महिन्याभरामध्ये मोटारींच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम फार झाला आहे वा होईल असे नाही. मुळात मोटारींच्या किमतीपेक्षा पेट्रोल, डिझेलची किंमत वाढते ती परवडत नसल्याचे दु:ख अनेकांना जाणवते. पण तरीही मोटार वापरण्याची सवय लागल्याने सार्वजनिक वाहनांवर अवलंबून राहाता येत नाही. अनेकांना ते आवडत नाही, रुचत नाही कोणाला ते कमीपणाचे वाटते तर कोणाला त्रासदायक वा अडचणीचेही असते. खरे म्हणजे मोटारींचा वापर व्यवस्थितपणे करू शकतो, इंधनाच्या किमतीपेक्षा आपल्याला आराम मिळेल, दुसऱ्यावर अवलंबून राहायला नको असा विचार मोटार खरेदीमागे असेल व निश्चितपणे मोटार वापरायची व विनाकारण घेऊन नुसती उभी करायची नाही हे ज्याला पटेल व परवडेल त्याने मोटार घ्यायला हरकत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मोटार ही गरज बनू लागली आहे. विशेष करून मध्यमवर्गीयांनाही परवडणाऱ्या मोटारी बाजारात येत असल्याने त्या घ्याव्यात असे मनात वाटते. कोणाला मोटार नको आहे? असा प्रश्न केला तर फार कमी लोक सांगतील की, नाही मला मोटार घेणे परवडत असले तरी मी सार्वजनिक वाहनच वापरेन. मोटार हे एक स्वप्न आहे. केवळ श्रीमंताचे नाही तर गरीबाचेही ते स्वप्न आहे. कधी काळी आपण स्वत:ची मोटार घेऊ व त्यातून सहकुटुंब हिंडू. ते स्वप्न प्रत्यक्षात किती येते, तुम्ही ते कसे उतरविता हे तुमच्या उत्पन्नावर, विचारांवर आणि वाहतुकीच्या स्थितीवर अवलंबून आहे. अद्याप भारतात स्क्रॅप पॉलिसी लागू झालेली नसल्याने १५ वर्षे झालेल्या मोटारीही वापरता येतात. सेकंडहॅण्ड मोटारींचीही स्वतंत्र बाजारपेठच आहे. सध्या १५ वर्षे जुनी मोटार असेल तर त्यावर वेगळी आकरणी आरटीओमध्ये भरावी लागते. काही असले तरी अशा मोटारींची संख्या काही कमी होत नाही आणि नवीन मोटारी घेण्याचे स्वप्नही बघायचे बंद होत नाही. मोटारींची बाजारपेठ वाढत आहे. पण त्याला मर्यादा आहे ती रस्त्यांची, अडथळे आहेत ते वाहतूक कोंडीचे आणि मोटार उभी करायची म्हटली तरी व्याप व संशोधन करावे लागते ते योग्य जागेचे! तेव्हा मोटारीच्या खरेदीचे स्वप्न पाहा, पण या साऱ्या अडचणींचा, मानसिकतेचा, पायाभूत सुविधांचा विचार करूनच स्वप्न सत्यात उतरवा.

वन्यजीवांचीही आबाळ
राजूर, १८ जून/वार्ताहर

अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिसरातील वनक्षेत्राचा निधी रखडल्याने अभयारण्यामधील वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वन विभागातील अनेक पदेही रिक्त असल्याने त्याचाही विपरित परिणाम होत आहे.
सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये ३६१ चौरस किलोमीटर वनक्षेत्रात अभयारण्य आहे. हा पूर्णपणे आदिवासी भाग आहे. साधारणपणे दहा वर्षांपूर्वी या भागात बिबटय़ा व अन्य वन्य प्राणी, तसेच पक्षांचे वास्तव्य होते. एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २८ टक्के क्षेत्र वन विभाग व डोंगरांनी व्यापला आहे. म्हणूनच १९८६ मध्ये येथे अभयारण्य घोषित झाले. वन व वन्यजीवांचे संरक्षण व्हावे या हेतूनेच हा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. पहिली सात वर्षे अभयारण्याचा कारभार अहमदनगर जिल्हा उपवन विभागामार्फत सुरू होता. या काळात वृक्ष लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यामुळे वन्यजीवांना संरक्षण मिळाले. बिबटय़ा, वाघ, कोल्हा, सांबर, नीलगाय, घोरपड, वानर, जंगली मांजर, उदमांजर, घुबडे, मोर, भोकर व पाण्यातील अनेक प्रकारचे मासे, कासव असे वन्यजीव येथे मोठय़ा प्रमाणावर वस्ती करून होते. नंतरच्या काळात मात्र या वनक्षेत्राची आबाळ सुरू झाली.
हे क्षेत्र १९९४ पासून नाशिक उपवन कार्यालयाच्या अखत्यारीत गेले. याच काळात जागतिक बँकेचे अर्थसहाय्य लाभले. तेव्हापासून येथे दोन वनसंरक्षक व कर्मचारी नियुक्त आहेत. या विभागाची शेंडी (भंडारदरा) व राजूर अशी दोन कार्यालये आहेत. सुरूवातीला फारशा अडचणी नव्हत्या. मात्र ९६ नंतर वनक्षेत्राचा निधी बंद झाला आणि वनक्षेत्राची आबाळ सुरू झाली. त्यानंतरच या क्षेत्राला उतरती कळा आली. त्यानंतरही राज्य सरकारने कोणतीच ठोस पाऊले उचलली नाहीत.
येथील वन्यजीवांनी अलिकडच्या काळात इतरत्र स्थलांतर केल्याचे उघड झाले. त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध न झाल्याने ही स्थिती ओढवली. नवीन वृक्षारोपण तर थांबलेच, मात्र वृक्षतोडीवरही कुणाचे नियंत्रण राहिले नाही. भंडारदरा कार्यालयातील वनक्षेत्र अधिकारी, गार्डची चार पदे, वनपाल तर राजूर कार्यालयातील चार गार्ड, वनपाल, वनमजुरांची दोन पदे रिक्त आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी इतर गोष्टींनाही मर्यादा आल्या आहेत. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलतानाच राज्य सरकारने या अभयारण्यात वन्य जीवांसाठी पिण्याचे पाणी, वृक्षतोडीला बंदी आदी गोष्टींचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.